इस्लामाबाद : पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतात उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात एक भीषण हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी सैनिकांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले आहे. या आत्मघातकी बॉम्बस्फोटात तब्बल १३ सैनिक ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात हा बॉम्बस्फोट झाल्याची घटना शनिवारी घडली आहे.
उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात एका ठिकाणी हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेले एक वाहन लष्करी ताफ्यावर धडकावल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात तब्बल १३ सैनिक ठार झाले असून १९ नागरिक जखमी झाल्याचे एका स्थानिक अधिका-याने सांगितल्याचे वृत्त आहे. अधिका-याने म्हटले की हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेले एक वाहन लष्करी ताफ्याजवळ आणले आणि ताफ्याला वाहनाची धडक दिली, यानंतर मोठा स्फोट झाला. या स्फोटात १३ सैनिक ठार झाले, १० लष्करी कर्मचारी आणि १९ नागरिक जखमी झाले. या घटनेबाबत एका पोलिस अधिका-याने सांगितले की, स्फोटामुळे दोन घरांचे छप्पर कोसळले आणि सहा मुले जखमी झाले आहेत.
हल्ल्यानंतर चार जखमी सैनिकांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही सांगण्यात येत आहे.
या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान तालिबानशी (टीटीपी) संलग्न असलेल्या हाफिज गुल बहादूर गटाने घेतली आहे. २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे इस्लामाबादने काबुलवर सीमापार हल्ले करणा-या दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप केला आहे. मात्र, हा आरोप अफगाण तालिबान नाकारत आहे.
दरम्यान, एएफपीच्या आकडेवारीनुसार, वर्षाच्या सुरुवातीपासून खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये सरकारविरोधी सशस्त्र गटांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे २९० लोक, बहुतेक सुरक्षा कर्मचारी मारले गेले आहेत. तसेच मार्च महिन्यात दक्षिण वझिरिस्तानमधील जंडोला चेकपोस्टजवळील फ्रंटियर कॉर्प्स कॅम्पवर आत्मघातकी हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानशी संबंधित १० अतिरेक्यांना ठार मारल्याचा दावा केला होता. तसेच त्याच महिन्यात बलूच लिबरेशन आर्मीने जाफर एक्स्प्रेस ट्रेनला लक्ष्य केले होते.