24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeराष्ट्रीयचारधाम यात्रा स्थगित

चारधाम यात्रा स्थगित

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

देहराडून : उत्तराखंडमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनाच्या भीतीमुळे चार धाम यात्रा एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. हवामान खात्याने उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट दिला आहे. हरिद्वार, ऋषिकेश, श्रीनगर, रुद्रप्रयाग, सोनप्रयाग आणि विकासनगर येथे यात्रेकरूंना थांबविण्याचे निर्देश पोलिस आणि प्रशासनाच्या अधिका-यांना देण्यात आले आहेत. गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी ही माहिती दिली. प्रतिकूल हवामान परिस्थिती लक्षात घेता, यात्रेकरूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे विनय पांडे यांनी म्हटले.

हवामान परिस्थिती आणि रस्त्यांच्या सुरक्षिततेचा आढावा घेतल्यानंतर चारधाम यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. यासाठी प्रशासन उद्या पुन्हा परिस्थितीचा आढावा घेईल असे विनय पांडे म्हणाले. भाविकांनी संयम बाळगावा आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. दुसरीकडे, हवामान विभागाने रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवसांसाठी या पर्वतीय राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. अनेक ठिकाणी वादळ आणि विजांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तराखंडमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील बारकोट तहसीलमधील सिलाई बंद भागात भूस्खलनाच्या दुर्दैवी घटनेत अनेक कामगार बेपत्ता झाले आहेत. दुसरीकडे, हवामान खात्याने मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर चारधाम यात्रा पुढील २४ तासांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. बागेश्वर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यानंतर अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.

अनेक जण बेपत्ता
उत्तरकाशीतील बारकोट येथील सिलाई बंद परिसरात ढगफुटी आणि भूस्खलनामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजला आहे. बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी काम करणारे अनेक कामगार बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच राज्य आपत्ती प्रतिसाद दल, एनडीआरएफ, पोलिस आणि महसूल विभागाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR