25 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रकुठलीही समिती नेमा, पण हिंदी सक्ती चालणार नाही म्हणजे नाही

कुठलीही समिती नेमा, पण हिंदी सक्ती चालणार नाही म्हणजे नाही

राज ठाकरे यांनी ठणकावले

मुंबई : प्रतिनिधी
शाळांमध्ये पहिली ते पाचवी इयत्तेसाठी हिंदी सक्ती चालणार नाही म्हणजे नाही, मग नरेंद्र जाधव यांची समिती नेमा वा आणखी कोणाची. महाराष्ट्राने व मराठी माणसाने या निर्णयाला ज्या प्रकारे विरोध केला आहे याची जाणीव जाधव यांनाही असेलच, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला. येत्या ५ तारखेला विजयी मोर्चा होईल, त्यात मी सविस्तर बोलेनच असेही ते म्हणाले. मात्र शिक्षणक्षेत्राचे,शाळांचे इतरही अनेक मूलभूत प्रश्न आहेत त्यावर विरोधी आमदारांनी अधिवेशनात आवाज उठवावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळांमध्ये हिंदी शिकविण्यासंदर्भातील दोन्ही जीआर रदद केल्याची घोषणा केली. त्रिभाषा सूत्रावर विचार करण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचेही ते म्हणाले. त्यानंतर ५ तारखेचा राज व उद्धव ठाकरे यांचा मोर्चा रदद करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र ५ तारखेला विजयी मेळावा किंवा मोर्चा काढण्यात येणार आहे. हिंदीसक्तीचा निर्णय रद्द झाल्याबद्दल मनसे पदाधिका-यांनी आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.

महिला मनसैनिकांनी राज ठाकरे यांचे औक्षणही केले. त्यानंतर पत्रकारपरिषदेत राज ठाकरे म्हणाले, मराठी माणूस, मराठी भाषा या विरोधात जो कोणी जाईल त्याला आपला विरोधच असेल. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर मला खा. संजय राउत यांचा फोन आला होता. आपण विजयी मेळावा करूया असे ते म्हणाले. त्यावर माझ्या माणसांशी बोलून विजयी मेळावा घेण्यासंदर्भात चर्चा करतो असे मी त्यांना म्हणालो. अद्याप त्याचे ठिकाण निश्चित झालेले नाही. सगळयांशी चर्चा करून अंतिम करू. पाच तारखेच्या या मेळाव्यात कोणाचाही झेंडा नसेल असेही राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात खूप प्रश्न तुंबलेले आहेत. उगाच भाषेवर विषय आणू नका. आमदारांनीही आता या विषयावर अधिवेशनात चर्चा करून वेळ वाया घालवू नये, महाराष्ट्रातल्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करावी. जीआर रद्द झाला आहे. आता इतर विषयांवर बोलावे. शिक्षणात अनेक त्रुटी आहेत. शाळा नाहीयेत. शिक्षकांना पगार नाहीयेत. अशा इतर अनेक विषयांना हात घालावा, असं आवाहन राज ठाकरेंनी सर्वपक्षीय आमदारांना केले.

महाराष्ट्रातील जनतेचा विजय
राज ठाकरे यांनी साहित्यिक, कलाकार, मराठी पत्रकार आदी सगळयांचे आभार. विषय श्रेय घेण्याचा नाही मात्र सगळयात आधी आम्ही आवाज उठविला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह इतरही पक्षांनी याला समर्थन दिले. त्यामुळे जर ५ तारखेला मोर्चा निघाला असता तर न भूतो न भविष्यती असा तो मोर्चा असता असेही राज ठाकरे म्हणाले.

राजकीय युतीबाबत राज ठाकरेंनी बोलण्याचे टाळले
हिंदीसक्ती विरुद्धच्या लढ्यात उद्धव ठाकरे गट व मनसे या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व नेतेमंडळी एकत्र आल्यामुळे दोन पक्षाच्या आगामी युतीची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात राज ठाकरेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता त्यांनी, हिंदी सक्तीच्या या सर्वपक्षीय भूमिकेला पक्षीय लेबल लावण्याची गरज नसल्याचे सांगितले. मोर्चाला पक्षीय लेबल लावू नका,असामी आधीच सांगितले होते. आता विजयी मेळाव्यालाही पक्षीय लेबल लावू नका. युत्या-आघाड्या या सगळ्या गोष्टी होत राहतील. पण मराठी भाषा संपली तर परत येणार नाही. भाषा ही संस्कृती टिकवत असते. उद्या तीच गेली, तर या युत्या-आघाड्यांना काय अर्थ आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार निवडणुकांच्या वेळी करता येईल. आता त्या गोष्टीचा विचार करता येणार नाही. आता हिंदीसंदर्भातील या सगळ्या गोष्टींकडे एक संकट म्हणूनच पाहायला हवे. त्याला राजकीय लेबलं लावू नयेत असे राज ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR