मुंबई : प्रतिनिधी
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाचा धसका घेऊन सरकारने त्रिभाषा सूत्राचा जीआरच रद्द केला. आता मोर्चा ऐवजी जल्लोष मेळावा होणार आहे हे दोघे एकत्र येत असल्याने अनेक डोमकावळे अस्वस्थ होऊन कावकाव करत आहेत असा टोला ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी आज लगावला.
ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याने महाराष्ट्राचे लक्ष या मोर्चाकडे लागले होते. मराठी माणसाची ताकद दिसणार होती. महाराष्ट्रात मराठी ताकदीचा विजय होणार होता, दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झाले होते, सत्ताधारी वैफल्यग्रस्त होते. महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार होता, म्हणून हा त्रिभाषा जीआर मागे घेतला अशी टीका संजय राऊत यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे केवळ अफवा पसरवत नाहीत, तर ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय धोरणानुसार खोटे बोलतात. जसे नरेंद्र मोदी आणि अमित शहा खोटे बोलतात. अशा विषयात कोणाचा तरी सल्ला घेणे आवश्यक असते, त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या काळात रघुनाथ माशेलकरांची समिती स्थापन केली होती. फडणवीस हे खोटे बोलतात त्यानी एकदा स्पष्ट करावे की आता त्यांनी नरेंद्र जाधवांची कमिटी का तयार केली आहे? अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुंबईसह महाराष्ट्र काबीज करणे हे आमचे ध्येय आहे. तसेच मुंबईसह महाराष्ट्राची सत्ता मराठी माणसाच्या हातात देणे आमची भूमिका आहे, ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचा धसका घेत सत्ताधारी घाबरले आहेत ही एक विजयाची पायरी आहे, इथून पुढे आम्ही एक-एक विजयाच्या पाय-या सर करत जाऊ. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीसाठी एकत्र येऊन आंदोलन करण्याची भूमिका घेतली यात सगळे आहे आहे.
याला बिटवीन द लाईन्स म्हणतात. दोन पक्षांमध्ये आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्तम संवाद सुरू आहे. त्यामुळे आम्हाला भविष्याची चिंता वाटत नाही असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मोर्चा ही भविष्यातील दोन ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी असे मी म्हणत नाही. पण ही महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकीकरणाची नांदी आहे. मराठी माणसाचे जे संघटन बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात उभे केले, त्याला तडे देण्याचे काम नरेंद्र मोदी अमित शहा या लोकांनी केले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने मराठी माणूस एकत्र होणार असेल तर त्याचे स्वागत करायला हवे असेही राऊत म्हणाले.