मुंबई : प्रतिनिधी
भाजप प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून अपेक्षेप्रमाणे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा एकमेव अर्ज आला आहे. मंगळवारी पाच वाजता त्यांच्या निवडीबाबतची अधिकृत घोषणा होईल.
रविंद्र चव्हाण यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. या निवडणुकीसाठी केंद्रिय निरीक्षक म्हणून केंद्रिय मंत्री किरण रिजीजू मुंबईत दाखल झाले आहेत. रविंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला असून त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे. मंगळवारी पाच वाजता याबाबतची अधिकृत घोषणा होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भाजप एकमेव असा पक्ष ज्यात पूर्ण लोकशाही पदधतीने विविध निवडणूका होतात. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता वरळी डोममध्ये पदग्रहणाचा कार्यक्रम होईल त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते येतील. महाराष्ट्राची निवडणूक झाल्यानंतर मुंबईसंदर्भात महाराष्ट्र अध्यक्ष व केंद्रिय नेतृत्व पुढील निर्णय घेतील. कोकणात आमचा विस्तार गेल्या काळात चांगल्या पद्धतीने झालाय त्यात रविंद्र चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. ते कोकणातले असले तरी त्यांचे काम केवळ कोकणापुरते मर्यादित नाही. कोकणात विस्ताराला स्कोप खूप आहे. महायुतीमुळे काही जागा लढता येत नाहीत पण कोकणातल्या कानाकोप-यात संघटन उभे राहिल असेही ते म्हणाले.