मुंबई : प्रतिनिधी
पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे शासन आदेश रविवारी मुख्यमंत्र्यांनी रद्द केले आणि दोन्ही ठाकरेंच्या पक्षांनी एकच जल्लोष केला. या दोन्ही पक्षांकडून आता ५ जुलै रोजी विजयी मेळावा घेण्यात येणार आहे. त्यासंबंधी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती आहे. तसेच मेळाव्यासाठी वरळी डोम या ठिकाणावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
राज्यात पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सरकारच्या या अप्रत्यक्ष हिंदी सक्ती विरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकवटले. दोन्ही ठाकरे बंधूंकडून ५ जुलै रोजी मराठी माणसाची शक्ती दाखवण्यासाठी आणि या निर्णयाला विरोध करण्यासाठी मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पण राज्य शासनाने हिंदीचा जीआर मागे घेतला. त्यामुळे हा मोर्चा होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले.
राज्य शासनाने हिंदी सक्तीवरून माघार घेणे ही मराठी माणसाच्या एकजुटीची शक्ती असल्याचे दोन्ही ठाकरेंनी नमूद केले. त्यामुळे विरोध मोर्चा जरी रद्द झाला असला तरी जल्लोष मोर्चा किंवा विजयी मेळावा घेण्यात यावा, अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. त्यावर राज ठाकरे यांनीदेखील विजयी मेळावा घेण्यास अनुकूलता दर्शविली. विजय मेळाव्यासाठी वरळी डोम या लोकेशनवर दोन्ही राजकीय पक्षांचा एकमत होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विजयी मेळाव्याचे नियोजन, गुप्त बैठका
शिवसेना ठाकरे आणि मनसेची ही युती मोर्चाच्या पलिकडे असावी, असा सूर आता दोन्ही पक्षांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच या विजयी मोर्चाच्या निमित्ताने दोन्ही ठाकरेंचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांच्या या अनुषंगाने बैठका सुरू आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जवळपास ४० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब तर मनसेचे बाळा नांदगावकर आणि अभिजीत पानसे यांच्यात गुप्त बैठक झाल्याचे समजते.