नागपूर : प्रतिनिधी
नागपूर-गोवा असा नव्याने होणा-या शक्तिपीठ महामार्गाला शेतक-यांकडून विरोध केला जात आहे. राज्य सरकारकडून महामार्ग करण्यास हिरवा कंदील मिळाला असून यासाठी मोजणी करण्याचे आदेश देखील दिले आहेत. मात्र यानंतर या महामार्गाला जोरदार विरोध केला जात असून राज्यातील १२ जिल्ह्यांतील शेतकरी याविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. त्यानुसार मंगळवार, १ जुलै रोजी सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, सांगली जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून परभणीत मात्र महामार्गासाठीची मोजणी थांबविण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
दरम्यान, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद), सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सुमारे ७,५०० ते २७,००० हेक्टर सुपीक आणि बागायती जमिनी अधिग्रहित करणार आहे, ज्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होईल. शेतकरी आपली वडिलोपार्जित जमीन गमावण्याच्या भीतीने आक्रमक झाले आहेत. शेतक-यांना कमी मोबदला मिळण्याची शक्यता आहे.
शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी द्रुतगती महामार्ग प्रकल्प आहे. नागपूर ते गोवा असा ८०२ कि.मी. लांबीचा सहापदरी मार्ग आहे.
परभणीत महामार्गाची मोजणी रोखली
परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सुरवाडी आणि सोनपेठ तालुक्यातील काही गावांमध्ये आज शासनाकडून मोजणी करण्यात येणार होती. मात्र ही मोजणी शेतक-यांच्या विरोधामुळे न करता अधिका-यांना परतावे लागले आहे. यानंतर अधिका-यांचा ताफा येथे आला. ज्यात कृषी विभाग, वन विभाग, भूमि अभिलेख, तहसील, पोलिस आदी विभागाचे अधिकारी मोजणीसाठी आले होते. मात्र शेतक-यांच्या विरोधामुळे त्यांचे काही चालले नाही. शेवटी मोजणी न करताच अधिका-यांना परतावे लागले आहे.
नांदेड-वसमत महामार्ग रोखला
शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आज चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार मालेगाव येथे नांदेड ते वसमत हा महामार्ग शेतक-यांनी रोखून धरला आहे. रास्ता रोको आंदोलनात शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील सहभागी झाले होते. कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यांतून हा महामार्ग काढण्याचा निर्णय घेतला. परंतु इतर जिल्ह्यांतील शेतक-यांनी देखील कोल्हापूरप्रमाणेच आमदार-खासदारांच्या घरावर मोर्चे काढले पाहिजेत; असे प्रखर मत शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केले.
सांगली-कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको सुरू
शक्तिपीठ महामार्ग रद्द करा; या मागणीसाठी सांगलीमध्ये सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. अंकली या ठिकाणी कोल्हापूर मार्गावर रस्ता रोको सुरू झाला आहे. महिलांसह मोठ्या संख्येने शेतकरी व सर्वपक्षीय नेते आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशी भूमिका घेऊन हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. शक्तिपीठ महामार्गबाधित शेती बचाव कृति समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत असून सांगली-कोल्हापूरबरोबर रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे.
सोलापुरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतक-यांनी रोखला
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात देखील शेतकरी आक्रमक झाले आहेत. यावेळी मोहोळ-पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतक-यांनी रोखला आहे. वारीच्या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतक-यांनी रोखल्याने वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. शेतक-यांची मागणी नसताना शक्तिपीठ महामार्ग करण्याचा हट्ट का होतोय?, दरम्यान या आंदोलनकर्त्या शेतक-यांना मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोल्हापुरात पुणे-बंगळुरू महामार्गावर आंदोलन
शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरात पुणे-बंगळुरू महामार्गावर आंदोलन सुरू झाले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे. किनी टोल नाका ते कागल या परिसरातील पुणे-बंगळुरू महामार्गावर शुकशुकाट आहे. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला आहे.
धाराशिवमध्येही विरोध
शक्तिपीठ महामार्गाला धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात विरोध वाढला आहे. महामार्ग रद्द करावा यासाठी धाराशिवमधील १० गावांनी ठराव घेतले आहेत. उर्वरित नऊ गावे दोन दिवसांत ठराव घेणार आहेत. शक्तिपीठ महामार्गविरोधी कृति समितीची माहिती देण्यात आली. शक्तिपीठ महामार्गाविरोधात रस्त्यावर आणि संविधानात्मक लढाई सुरू आहे.