मुंबई : भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आज (दि. १) विधानसभेत उमटले. पंतप्रधान मोदी हे शेतक-यांचे बाप आहेत, या आशयाच्या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरकारने शेतक-यांची माफी मागावी, या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले होते, मात्र त्यांना बोलू दिले नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. याच मुद्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आल्याने सभागृहातील वातावरण अधिकच तापले.
विधानसभेतील गदारोळानंतर माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, बबनराव लोणीकर यांनी ‘शेतक-यांचा बाप मोदी आहे, पायातले चप्पल आम्ही दिले, आई-बहिणीला पैसे आम्ही दिले,’ असे शेतक-यांचा घोर अपमान करणारे वक्तव्य केले आहे. सभागृहात याच विषयावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि शेतक-यांची माफी मागावी, अशी मागणी आम्ही केली होती.
बोलू दिले नाही, म्हणून भूमिका घ्यावी लागली
वडेट्टीवार पुढे म्हणाले, जर सरकारने शेतक-यांची माफी मागितली असती, तर विषय तिथेच संपला असता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही हीच मागणी लावून धरली. मात्र, आम्हाला बोलूच द्यायचे नाही, अशी भूमिका सत्ताधा-यांनी घेतली. आम्ही अध्यक्षांकडे मागणी करूनही आम्हाला बोलण्याची संधी दिली नाही, म्हणूनच आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागली.
आम्ही शेतक-यांच्या पाठीशी
शेतक-यांचा अवमान करणा-यांना जर हे सरकार पाठीशी घालत असेल, तर आम्ही सभागृहात बसू शकत नाही, असे सांगत वडेट्टीवार यांनी सरकारचा निषेध केला. याच मागणीसाठी नाना पटोले यांना निलंबित करण्यात आले. शेतक-यांच्या हक्कांसाठी लढताना आम्हाला तुरुंगात टाकले तरी चालेल, पण आम्ही शेतक-यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा इशाराही त्यांनी दिला.