सांगली : प्रतिनिधी
शक्तिपीठ महामार्ग कृति समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अंकली फाटा (ता. मिरज) येथे रास्ता रोको आंदोलन करत महामार्ग ठप्प केला. याप्रकरणी खासदार विशाल पाटील यांच्यासह ५० ते ६० जणांवर प्रशासनाच्या बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शक्तिपीठ महामार्ग कृति समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बाधित शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. ३०) सकाळी मिरज तालुक्यातील अंकली फाट्यावर तीव्र आंदोलन केले. ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा आक्रमक घोषणा देत आंदोलकांनी महामार्ग अडवला, ज्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या आंदोलनात खासदार विशाल पाटील स्वत: सहभागी झाले होते, ज्यामुळे या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई
जिल्हाधिका-यांनी २० जून रोजी जिल्ह्यात बंदी आदेश लागू केले होते. या आदेशाचा भंग करून आंदोलन करण्यात आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. सहाय्यक पोलिस फौजदार लक्ष्मण जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली असून, पोलिसांनी आंदोलकांना नोटिसा बजावल्या आहेत.