नाशिक : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त रस्ते विकासासाठी आवश्यक भूसंपादनासाठी शासनाने समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची नियुक्ती झाली असून, नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना सदस्य सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यानिमित्त देशभरातून सुमारे पाच कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. कुंभमेळ्यादरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर व्यतिरिक्त नाशिकजवळील अन्य महत्त्वाच्या तीर्थक्षेत्र ठिकाणी शिर्डी-शनिशिंगणापूर आदी ठिकाणी भक्तगण भेटी देतील. या बाबी विचारात घेऊन नाशिक व त्याला जोडणा-या रस्त्यांच्या सुधारणांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाती घेण्यात आली, तर काही नवीन कामेही प्रस्तावित करण्यात आली आहेत. या संदर्भात नाशिक कुंभमेळा अनुषंगाने विविध रस्त्यांच्या कामांबाबत दि. २२ जून रोजी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नागपूर येथे बैठक पार पडली.
यात विविध राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी आवश्यक असणा-या जमिनींचे संपादन सत्वर होण्यासाठी अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीची नियुक्ती शासनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सिंहस्थांतर्गत रस्ते विकासाला चालना मिळणार आहे.
भूसंपादन समिती
रस्ते विकासासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सडक परिवहन व राजमार्ग विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत फेगडे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (मुंबई) चे प्रादेशिक अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभागातील राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार हे सदस्य असून नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. गेडाम हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.