नागपूर : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील विधान परिषदेत म्हणाले, ‘‘सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएच.डी. करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. परंतु केवळ २०० विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ही संख्या वाढवण्यात यावी.’’ सतेज पाटील यांची मागणी ऐकताच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पीएच.डी. करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत? अजित पवारांच्या या धक्कादायक वक्तव्याचे सतेज पाटलांसह अनेकांना आश्चर्य वाटले.
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापला आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. अशातच सारथीसारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील यावर विधान परिषदेत चर्चा झाली.
विधान परिषदेतील या वक्तव्यामुळे अजित पवार समाजमाध्यमांवर ट्रोल होऊ लागले आहेत. पीएच.डी. करणारे विद्यार्थी अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. तर काहींनी अजित पावारांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.
अजितदादा बोलले ते चूकच! : रोहित पवार
अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून रोहित पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यामध्ये राजकीय लढाई सुरू झाली. रोहित पवार आक्रमकपणे अजित पवार यांच्या विरोधात बोलताना दिसतात. आताही अजित पवार यांच्या पीएच.डी. करणा-या विद्यार्थ्यांसंदर्भातल्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शाब्दिक वार केला आहे. अजित पवार यांनी पीएच.डी.चे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांबाबत केलेले विधान चुकीचे आहे. त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करतो, असे रोहित पवार म्हणाले. युवकांवर कुणी शंका घेता कामा नये. पीएच.डी. करणारी मुले कोण आहेत? तर ही गरिबाची मुले आहेत. पीएच.डी.साठी जो वेळ लागतो, त्यासाठीचा पैसा या मुलांकडे नाही. त्यामुळे ते सरकारकडे येत असतील. सरकारची मदत घेत असतील तर त्यात चूक काय? एखादा श्रीमंताचा मुलगा असता तर तो सरकारकडे आला असता का? ज्या मुलांकडे क्षमता आहे, बुद्धिमत्ता आहे. पण पैसा नाही, म्हणून ही मुले सरकारच्या स्कॉलरशिपवर शिकत असतील तर त्यात काहीही चूक नाही. त्यावर कुणी शंका घेऊ नये. अजितदादा जे बोलले त्याचा मी निषेध करतो, असे रोहित पवार म्हणाले.