29 C
Latur
Thursday, March 12, 2026
Homeमहाराष्ट्रकोकाटेंकडील खात्याची जबाबदारी अजित पवारांकडे

कोकाटेंकडील खात्याची जबाबदारी अजित पवारांकडे

मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

मुंबई : माणिकराव कोकाटेंच्या खात्याची जबाबदारी आता कोणाकडे दिली जाणार? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खात्याची जबाबदारी सध्या अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहे.

माणिकराव कोकाटे यांनी मंत्रि­पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया देत महत्वाचं भाष्य केलं आहे. कोकाटे यांनी मंत्रि­पदाचा राजीनामा दिल्यामुळे आता त्यांच्या जागी मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार? यावर अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. मात्र, त्यावर थेट भाष्य न करता मुख्यमंत्री फडणवीसांनी अगदी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया देत माणिकराव कोकाटे यांचा मंत्रि­पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याचे सांगितले.

कोकाटेंवर आरोप काय आहेत?
मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणा-या सदनिका बनावट दस्तावेज देऊन लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात नुकतंच अटक वॉरंट निघालेले आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ते सध्या आजारी असल्याने लिलावती रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले जात आहे. सदनिका बनावट दस्तावेज देऊन लाटल्याचा आरोपात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाल्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रि­पदाचा राजीनामा दिला आहे.

कायदेशीर प्रक्रियेवर आमचा विश्वास : अजित पवार
माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वत: स्वीकारण्यात आला आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे. सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचे काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR