लातूर : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाने राज्यभर उग्र भूमिका घेतली आहे. मराठवाड्यात तर अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झालेली पाहता लातूर जिल्हा पोलिसांनी आपली यंत्रणा सतर्क ठेवली असून जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींच्या घर कार्यालयांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गावागावात साखळी उपोषणे सुरू आहेत. नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नेत्यांना फिरणेही कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थांच्या रोषाचा सामना नेतेमंडळींना करावा लागला आहे. मराठवाड्यातील शेजारील बीड, धाराशिव, परभणी हिंगोली जिल्ह्यात आंदोलनाने धारण केलेले उग्र रूप पाहता व आंदोलनाच्या भविष्यातील वाटचालीचा अंदाज आल्याने लातूर पोलिसही कमालीचे सतर्क झाले असून जिल्ह्यातील खासदार-आमदार व प्रमुख राजकीय नेत्यांच्या घर, संपर्क कार्यालयांना सुरक्षा कवच पुरविण्यात आले आहे. उपलब्ध मनुष्यबळ कमी पडत असल्याने जिल्ह्यात एक एसआरपीफ कंपनी व अतिरिक्त होमगार्ड मागविण्यात आले आहे. त्यात ९०० पुरुष तर १०० महिला होमगार्डचा समावेश आहे.