36.7 C
Latur
Thursday, March 26, 2026
Homeमहाराष्ट्रखरातसारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो.... अरे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र?

खरातसारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो…. अरे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र?

राज ठाकरे यांचा उद्ग्नि सवाल

मुंबई : प्रतिनिधी
अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दश: गरगरल्यासारखे झाले. परवा गुढी पाडवा मेळाव्यात महाराष्ट्राच्या सशक्त परंपरेचे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसे या देशाला दिली आहेत याचे सादरीकरण केले होते. त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र? हा प्रश्न पडतो अशा संतप्त भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

हा खरात स्त्रियांचे शोषण करतोय, ते झाले तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपले भले करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही. आधी आमदार खासदारकीची तिकिटे मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधा-यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळाले की झाले, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझे काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचे संपूर्ण राजकीय भावविश्व अडकले असल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

महत्वाकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढले आणि याचा तपास सुरु केला आहे. जर तुम्हाला याचे श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होते आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळे घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून कोणाला दोषी धरायचे? माझ्या तर कानावर असे पण येत आहे की कोणाच्या तरी महत्वाकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळे प्रकरण बासनात गुंडाळले जाईल. तेंव्हा या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा, तसे केलेत तर आणि तरच तुमच्या भाषणांत तुम्हाला संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे, अन्यथा नाही असेही राज ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR