Homeमहाराष्ट्रविदर्भ तापला, पारा ४१ अंशांवर!

विदर्भ तापला, पारा ४१ अंशांवर!

ओकोल्यासह अनेक शहरांत सूर्याचा प्रकोप वाढला
अकोला : प्रतिनिधी
राज्यात उन्हाच्या झळा अधिकच तीव्र झाल्या असून विदर्भातील महत्त्वाच्या शहरांनी ४१ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून सूर्याचा प्रकोप वाढला आहे.

विदर्भ सध्या अक्षरश: तळपत असतानाच हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. जोरदार वा-यासह येणा-या या पावसामुळे तापमानात अचानक बदल होऊन नागरिकांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. उपराजधानीत तापमान ३९ अंश असले तरी हवेतील आर्द्रतेमुळे नागरिक घामाघूम झाले आहेत. सकाळपासूनच सुरू होणा-या उन्हाच्या तीव्रतेमुळे अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे कठीण झाले आहे.

ग्रामीण भागातील पारा ४० अंशांच्या आसपास राहिल्याने शेतीची कामे रखडली आहेत. पिकांवर उष्णतेचा ताण येत असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. भंडारा, गोंदिया आणि बुलढाणा परिसरात तापमान ३८ अंशांवर असले तरी उष्णतेचा प्रभाव कमी झालेला नाही. बाष्पीभवन वाढल्याने शेतातील ओलावा कमी होत असून बळीराजा संकटात सापडला आहे.

दुपारी घराबाहेर पडू
नका, प्रशासनाचा सल्ला
प्रशासनाने नागरिकांना दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. मुबलक पाणी पिणे, हलके सुती कपडे वापरणे आणि डोक्याचे संरक्षण करणे उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

उष्णतेची लाट कायम राहणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात उष्णतेची लाट अजून काही दिवस कायम असेल. मात्र, काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR