केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती, दोन्ही मार्गांचे ८० टक्के काम पूर्ण
पंढरपूर : तालुका प्रतिनिधी
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंढरपूर, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांसारखी महत्त्वाची देवस्थाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी रस्ते जाळे मजबूतीचे महत्त्व मोठे आहे. या बाबी लक्षात घेऊन बांधण्यात आलेले हे महामार्ग प्रकल्प जिल्ह्यातील आध्यात्मिक स्थळांपर्यंत पोचण्यास भाविकांसाठी सुलभ झाले आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पालखी घेऊन येणा-या वारकरी भाविकांसाठी वेगळा रस्ता केला आहे. यामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवार, दि. १४ मे रोजी केली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते-पाटील, राम सातपुते, जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी विजया पांगरकर, सचिन इथापे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमन श्रीवास्तव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटी उपस्थित होते.
सध्या पालखी महामार्गाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करण्यात येतील. पालखी महामार्गावरील काही ठिकाणची रखडलेली कामे डिसेंबरअखेर पूर्ण होतील. वाखरी ते पंढरपूर रस्त्याच्या कामाबाबत रेल्वे प्रशासनाकडून काही परवानगी आलेली नाही, त्याबाबत तात्काळ पाठपुरावा करून काम मार्गी लावण्यात येईल, असेही मंत्री गडकरी यांनी सांगितले.
माळशिरस तालुक्यातील घुले वस्ती येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या पुरातन विहिरीचे जतन, संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून माळशिरस तालुक्यातील घुले वस्ती या ठिकाणी पालखी महामार्गात विशेष रचना करून बांधकाम केले. पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील बाजीराव विहिरीचेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जतन व संवर्धन केले. या दोन्ही विहिरींची पाहणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यावेळी परिसरात वृक्षारोपणदेखील करण्यात आले.
बसने प्रवास करीत केली
पालखी महामार्गाची पाहणी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करावा, महानगरात मेट्रोने प्रवास करावा, असे म्हटले होते. मोदींच्या आवाहनानुसार रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बसने प्रवास करीत संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यावर आणण्याचे आदेश दिले. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सुरक्षा कर्मचारी, अधिकारी यांच्यासह बसने प्रवास केला.
















