रेणापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत करण्यात आलेल्या मूल्यमापन प्रक्रियेत रेणापूर तालुक्यातील खरोळा ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करीत तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला असून १२ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार अभियानांतर्गत नियुक्त समितीने ग्रामपंचायतीच्या विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून विकासकामे, प्रशासनातील पारदर्शकता, स्वच्छता, पाणीपुरवठा, कर वसुली, लोकसहभाग तसेच शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला होता. या मूल्यमापनात खरोळा ग्रामपंचायतीने विकासाभिमुख उपक्रम, डिजिटल प्रशासन आणि नागरिकाभिमुख सेवांमध्ये विशेष ठसा उमटविला आहे.
मागील पंचवार्षिक काळात माजी सरपंच धनंजय सुधाकरराव देशमुख, माजी उपसरपंच इनायतअली शेख ग्रामपंचायत सदस्य, ग्राम पंचायत अधिकारी आर. व्ही. अकुंशवाड व कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून विविध विकासकामे राबविण्यात आली. त्याचाच परिपाक म्हणून ग्रामपंचायतीस हा मानाचा क्रमांक मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. या यशाबद्दल सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
















