लातूर : प्रतिनिधी
लातूरमधील शिक्षणक्षेत्रामध्ये प्रामाणिकपणाच्या व गुणवत्तेच्या आधारावर शिक्षणाचा पवित्र ‘लातूर पॅटर्न’ निर्माण करणा-या लातूरमधील शिव छत्रपती शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालय व दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद विज्ञान महाविद्यालय या ‘लातूर पॅटर्न’च्या ख-या ‘हिरों’चा सन्मान दि. ३१ मे रोजी ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील परिवाराच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. येथील औसा रोडवरील तुलसी बॅक्वेट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास शहराच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे, प्राचार्य अनिरुद्ध जाधव, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अजय जाधव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, अॅड. श्रीकांत उटगे, प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यरांनी मनोगत व्यक्त करताना ‘लातूर पॅटर्न’कसा घडला, याबाबत सविस्तर विवेचन केले. नीट परीक्षेचा अभ्यासक्रम ‘एनसीआरटी’तयार करते आणि १० वी, १२ वीचा अभ्यासक्रम राज्य शासनाच्या शिक्षण मंडळाकडून तयार केला जातो. नीटची परीक्षा संपूर्ण देशासाठी समान घेतली जाते. परंतु, १२ वीची परीक्षा देशासाठी समान का घेतली जात नाही?, असा प्रश्न उपस्थित करुन नीट परीक्षेचा अभ्यासक्रम आणि १२ वी परीक्षेचा अभ्यासक्रम यात मोठी तफावत असल्यामुळे नीटच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेगळी तयारी करावी लागते. यातूनच विद्यार्थ्यांचा खाजगी क्लासकडे जाण्याचा ओढा वाढतो. याकडे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
राजर्षी शाहू महाविद्यालय आणि दयानंद विज्ञान महाविद्यालय या दोन ज्ञान मंदिरांनी ४०-५० वर्षांत खुप मेहनतीने शिक्षणाचे पावित्र्य जपतले. त्यांच्या योगदानातूनच शिक्षण क्षेत्रातील ‘लातूर पॅटर्न’घडला. या दोन्ही महाविद्यालयांतील चांगल्या शिक्षणसेवकांचा गौरव करण्याचे भाग्य मला लाभल्याने, असे ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील कवठेकर प्रास्ताविकात म्हणाले. या कार्यक्रमात प्राचार्य अनिरुद्ध जाधव, डॉ. अजय जाधव, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, लक्षमीरमण लाहोटी, रमेश बियाणी यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. शिववाजी गायकवाड, प्राचार्य डॉ. बिराजदार, प्राचार्य आर. एल. कावळे यांच्यासह शिक्षणक्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.
















