किल्लारी : वार्ताहर
शिक्षण, सामाजिक कार्य, संघटनात्मक नेतृत्व आणि विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारीचे प्राचार्य डॉ. संग्राम विठ्ठलराव मोरे यांना दैनिक आधुनिक केसरी समूहातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘आयडॉल महाराष्ट्र २०२६’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. मोरे यांनी विद्यार्थी चळवळ, शिक्षक-प्राध्यापक संघटना, शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक बांधिलकी आणि कृषी क्षेत्रात केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. प्राध्यापक व प्राचार्य म्हणून कार्य करताना ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अनोखे उपक्रम राबवितात. शिक्षक संघटनांमध्ये नेतृत्व करताना अनेक शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे. सामाजिक कार्यातही त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. पर्यावरण संवर्धन, शेतकरी प्रश्न, समाजजागृती आणि लोकहिताच्या उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ‘आयडॉल महाराष्ट्र २०२६’ या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून तसेच समाज प्रबोधन अकादमीच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. कुसुम मोरे, अकादमीचे सचिव सुधाकर शिंदे, अकादमीचे कोषाध्यक्ष डॉ. संजय मोरे यांनी डॉ. संग्राम मोरे यांचे अभिनंदन केले आहे. हा सन्मान छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित समारंभात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला आहे. डॉ. संग्राम मोरे यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत
आहे.
















