नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात गोकुळ गिते यांच्या बंडखोरीमुळे सत्ताधारी महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन व उदय सामंत नाशकात तळ ठोकून आहेत.
महायुतीमध्ये नाशिक विधान परिषदेची जागा सत्ताधारी शिवसेनेला सुटली आहे. प्रारंभी गोकुळ गिते यांचे बंधू तथा भाजप नेते गणेश गिते यांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली. पण गुरुवारी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. पण गोकुळ यांनी मात्र आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे या मतदारसंघात गोकुळ गिते यांचा सामना महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे तथा अन्य एक उमेदवार प्रसाद हिरे यांच्याशी होणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे मंत्री उदय सामंत व गिरीश महाजन हे आता गोकुळ गिते यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण गोकुळ गिते यांनी पाठिंबा देण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे.
माझ्यावर कुणीही दबाव आणू नये
गोकुळ गिते म्हणाले, महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आता निवडणूक खूप पुढे गेली आहे. समोरच्या उमेदवाराच्या (नरेंद्र दराडे) मुलाने माझा बाप काढला. अर्वाच्च शब्दांत धमकी दिली. त्यामुळे मला उमेदवारी करणे क्रमप्राप्त आहे. महायुतीचा उमेदवार क्रियाशील नसून निष्क्रिय आहेत. या निष्क्रिय उमेदवारासाठी भाजप युतीचे नेते माझ्यावर दबाव आणत आहेत. माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी माझ्यावर दबाव आणू नये. माझा प्रचार सुरू झाला आहे. येथील सर्वाधिक नगरसेवक माझ्यासोबत येतील असा मला ठाम विश्वास आहे.
आता निवडणूक खूप पुढे गेली
नाशिकच्या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन व उदय सामंत येथे आले आहेत. माझा अद्याप कुणाशीही संपर्क झाला नाही. विशेषत: माझा कोणता गैरसमजही झाला नाही. मला माघार घ्यायची असती, तर ती कालच घेतली असती. समोरच्या उमेदवाराने माझ्या घरी येऊन मला विनंती केली असती, तर मी माघार घेण्याचा विचार केला असता. पण मला शिवीगाळ झाली. माझा बाप काढला गेला. त्यामुळे त्यांना जाहीर पाठिंबा देण्याचा विषयच येत नाही. आता निवडणूक खूप पुढे गेली आहे. ही काही ग्राम पातळीवरची निवडणूक नाही, असे गोकुळ गिते म्हणाले.
















