पूर्णा : पूर्णा नगर पालिकेने मार्च महिन्यात अतिक्रमण हटाव मोहिम राबविली होती. परंतू या मोहिमेतील दुटप्पी धोरणाचा निषेध व्यक्त करत मुख्याधिका-यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी समितीचे तालुकाध्यक्ष लोखंडे यांनी बुधवार, दि. १० जून पासून शहरातील पोलिस स्टेशनच्या परिसरात अर्धनग्न आमरण उपोषणास सुरूवात केली आहे.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कृष्ट गुट्टे यांनी मार्च २०२६ मध्ये संपूर्ण शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्ष कारवाई करताना नगर पालिकेने अत्यंत गरीब आणि हातावर पोट असणा-या चणे-फुटाणे विक्रेते, मोची आणि पानटपरीधारकांनाच लक्ष्य केल्यांचा आरोप होत आहे. या कारवाईने अनेकांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांचे संसार उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छ. शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, टेलिफोन परिसर, पोस्ट ऑफिस आणि पोलिस स्टेशन परिसरातील काही पक्क्या अतिक्रमणांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी समितीने केला आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून मुख्याधिकारी डॉ. गुट्टे यांना तात्काळ निलंबित करण्याच्या मागणीसाठी हे आमरण उपोषण छेडण्यात आले आहे. या संदर्भातील निवेदनाच्या प्रती लोखंडे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनाही दिल्या आहेत.
















