परभणी : सोनपेठ तालुक्यातील रेवा तांडा येथील गट क्रमांक १८५ मधील गायरान जमिनीवर गेल्या २५ ते ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या जवळपास २५ कुटुंबांना बेदखल करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आल्याचा आहे. तहसीलदारांनी पोलिस बंदोबस्तात या कुटुंबांना घरातून बाहेर काढून त्यांची घरे पाडण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात रेवा तांडा येथील नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा बुधवार, दि.१० जून रोजी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रेवा तांडा येथील संबंधित कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळालेला आहे. अनेक लाभार्थ्यांना शौचालय योजनेचा लाभ देखील दिला आहे. या कुटुंबांची नावे घरकुल योजनेच्या यादीत समाविष्ट असून दि. २८ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांच्या घरांची पाहणीही करण्यात आली असून काहींना घरांचे हप्तेही बँक खात्यात जमा झाले आहेत. याशिवाय जलजीवन मिशन अंतर्गत गावात घरोघरी नळजोडणी देण्यात आली आहे. असे असतानाही कोणतीही योग्य प्रक्रिया न राबविता आणि काही प्रकरणांत नोटीस न देता कारवाई करण्यात आली आहे. विशेषत: शिवाजी सखाराम भोसले हे बाहेरगावी मजुरीसाठी गेले असताना त्यांना कोणतीही नोटीस न देता त्यांचे घर पाडण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
रेवा तांडा येथील गायरानधारक कुटुंबांना त्यांच्या जागेवरून बेदखल करण्यात येऊ नये. संबंधित गायरानधारकांना नमुना क्रमांक ८ देण्यात यावा. गट क्रमांक १८५ मध्ये मोठ्या प्रमाणावर गायरान जमीन उपलब्ध असल्याने संबंधित कुटुंबांना त्यांच्या ताब्यातील जागेवर कायम ठेवून उर्वरित जागेवर शासकीय गोदाम उभारण्याचा पर्याय विचारात घ्यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देताना कॉ. अॅड. माधुरी क्षीरसागर, शिवाजी कदम, तानाजी भोळे, केशव राठोड, प्रयागबाई राठोड, गणेश राठोड, प्रकाश चव्हाण, उत्तम चव्हाण, बळीराम चव्हाण, गिरजाबाई चव्हाण, उषाबाई चव्हाण, सुनीता पवार, निलाबाई पवार, सिंधुबाई राठोड, प्रियंका राठोड, संगीता जाधव, सुमनबाई राठोड, सुनीता चव्हाण, कुलूभाई जाधव, अनुसयाबाई जाधव, सारिका जाधव, भागुबाई राठोड, लक्ष्मी राठोड, सविता चव्हाण, कविता पवार, सखुबाई पवार, पंकूभाई जाधव, सुमनबाई जाधव यांच्यासह अनेक गायरानधारक उपस्थित होते.
















