सेलू : मागील काही वर्षापासून महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे. मात्र त्याची अंमलबजावणी पूर्ण प्रभावाने होताना दिसून येत नाही. मात्र अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच विविध ठिकाणी धाडींचे सत्र सुरू झाले आहे. या धाडींचा संपूर्ण महाराष्ट्रासह सेलू शहरातील गुटखा माफिया, पानटपरी चालकांनी धसकी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
तुकाराम मुंडे यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारतात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणा-या व्यक्ती, संस्था यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उगारला आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यात किंवा गावात कारवाई होत आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू सारख्या तालुक्याच्या ठिकाणी देखील पानपट्टीवाले तसेच गुटखा विक्रेत्यांनी आयुक्त मुंढे यांची धसकी घेतल्याचे चित्र दिसत आहे. मुंढे हे सेलूला येणार असून आपली देखील चौकशी होऊ शकते या भितीमुळे नसते झेंगट पाठीमागे लावून घेण्यापेक्षा गुटखा विक्री बंद करणे अथवा आपली पानटपरी बंद ठेवणेच बरे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया वर्षानुवर्षांपासून गुटखा विक्री करणारे व पानटपरी चालकांमधून ऐकावयास मिळत आहे.
आयुक्त मुंढे सेलूला येणार असल्याच्या चर्चेमुळे पानटपरी धारकांचे धावे दनानले आहे. महाराष्ट्रात गुटखाबंदी होऊन अनेक वर्ष झालेली असली तरी गुटखा मात्र सर्रास विक्री होताना दिसून येतो. आयुक्त मुंडे यांनी पदभार स्वीकारताच कायद्याची जाणीव नागरिक तसेच व्यापा-यांमध्ये झाल्याचे दिसून येत आहे
















