पूर्णा : शहरातील आनंद नगर परिसरातील एका विधिज्ञांना ४५ लाख रूपयांची खंडणी द्या अन्यथा मुलाला जिवे मारू अशी धमकी दि.११ जून रोजी देण्यात आली होती. या घटनेने संबंधीत कुटुंब भयभीत झाले होते. याबद्दल पूर्णा पोलिसांना माहिती देताच त्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून कावलगांव परिसरात ३ खंडणी बहाद्दरांना पकडत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पुर्णा शहरातील आनंद नगर येथील अॅड. जि. एन. डाखोरे यांच्या घराच्या गेटला दि. ६ जून रोजी त्यांचा मुलगा प्रसादच्या नावाने लाल, निळ्या व काळ्या अक्षरांत ४५ लाख ५५ हजार रुपये रोख द्या, अन्यथा जीवे मारू अशी उघड धमकी देण्यात आली. होती. मागणी केलेली रक्कम दि. ११ जून रोजी सकाळी ११ वाजता नांदेड रोडवरील चुडावा-बसमत फाटा परिसरात आणण्याचे निर्देश दिले होते. पैसे न दिल्यास ११ दिवसांत किंवा ११ महिन्यांत तुझी लाश पडेल, अशा थरारक शब्दांत धमकी देण्यात आल्याने डाखोरे कुटुंब भयभीत झाले होते. प्रसाद यांनी ही बाब त्यांच्या वडिलांना सांगितल्यानंतर सुरुवातीला कुणीतरी मानसिक त्रास देण्यासाठी हा प्रकार केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, धमकीत दिलेली नमूद तारीख जवळ आल्याने कुटुंबीयांनी अखेर पुर्णा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी प्रसाद यांना चुडावा (वसमत फाटा) येथे पाठविले. दुपारी १२ वाजताच्या सुमारास (एमएच २६ बीएक्स ६१७२) क्रमांकाची पांढ-या रंगाची आय-२० कार प्रसाद यांच्या जवळ आली. कारमधील एका इसमाने प्रसाद यांना गाडीत बसण्याचा इशारा केला. प्रसाद गाडीत बसण्याचा प्रयत्न करत असतानाच संशय आल्याने आरोपींनी कार भरधाव वेगाने चुडाव्याकडे पळविली. यावेळी पोलिसांनी तातडीने पाठलाग सुरु करत कावलगाव परिसरात संबंधित कार अडवून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी आपली नावे तन्मय तुळशीराम पाचकोर (रा. सुरवाडी, सध्या आनंद नगर, पुर्णा), केदार अशोक घवाड (रा. कानडखेड) आणि युवराज प्रकाश कदम (रा. रुंज) अशी सांगितली.
आरोपींनी असा रचला खंडणीचा कट
मुख्य आरोपी तन्मय याने चौकशीत धक्कादायक कबुली दिली. तन्मय व केदार घवाड हे नांदेड येथील एका खासगी मोबाइल अॅप लोन कंपनीत वसुलीचे काम करीत असल्याने त्यांना पैशांच्या व्यवहाराची माहिती होती. प्रसाद डाखोरे यांचे वडील वकील असल्याने त्यांच्याकडे मोठी रक्कम असावी, असा अंदाज बांधून खंडणी उकळण्याचा कट रचल्याची कबुली त्यांनी दिली. धमकीची चिठ्ठी केदार याने लिहून डाखोरे यांच्या घराच्या गेटला लावल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी पुर्णा पोलिसांनी खंडणी, धमकी व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
















