नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मे महिन्यात घाऊक महागाई वाढून ९.६८ टक्क्यांवर पोहोचली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये ती ८.२६ टक्के होती. मे महिन्यात महागाई ४३ महिन्यांत सर्वाधिक आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये ती १०.७० टक्क्यांवर पोहोचली होती. वाणिज्य मंत्रालयाने आज म्हणजेच १५ जून रोजी घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली.
महागाई वाढण्याचे कारण म्हणजे दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि इंधनाच्या किमती वाढणे हे आहे. याशिवाय धान्य आणि तेलही महाग झाले आहे. खरे तर अमेरिका आणि इराण यांच्यात साडेतीन महिन्यांपासून तणाव राहिलेला आहे. परिस्थिती सामान्य न झाल्यास महागाई आणखी वाढू शकते. दरम्यान, आता अमेरिका-इराण यांच्यात करार झाल्याने युद्ध थांबेल आणि महागाईपासून काही अंशी का होईना दिलासा मिळेल, अशी आशा आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर खूप घसरले आहेत.
घाऊक महागाईचे एकूण ४ भाग असून, यात प्रायमरी आर्टिकल्स हा एक भाग असून, याचे वेटेज २२.६२ टक्के आहे. फ्यूल अँड पॉवरचे वेटेज १३.१५ टक्के आणि मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्टसचे वेटेज सर्वाधिक ६४.२३ टक्के आहे. विशेष म्हणजे प्रायमरी आर्टिकल्सचेही चार भाग असून, फूड आर्टिकल्स जसे की धान्य, गहू, भाज्या आणि नॉन-फूड आर्टिकल्समध्ये तेलबिया येतात. याशिवाय खनिजे आणि क्रूड पेट्रोलियम याचाही यात समावेश असून, महिन्यात किरकोळ महागाई ३.९३ टक्के राहिली. एप्रिलमध्ये ती ३.४८ टक्के होती. गेल्या ५ महिन्यांत किरकोळ महागाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ४ टक्के लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे.
घाऊक किंमत निर्देशांकांचा सामान्य माणसावर चांगलाच परिणाम दिसून येतो. घाऊक महागाई दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास त्याचा बहुतेक उत्पादन क्षेत्रांवर वाईट परिणाम होतो. जर घाऊक किंमत खूप जास्त काळ उच्च पातळीवर राहिली तर उत्पादक त्याचा भार ग्राहकांवर टाकतात. सरकार केवळ करांद्वारे डब्ल्यूपीआय नियंत्रित करू शकते.कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली. तथापि, सरकार कर कपात एका मर्यादेतच कमी करू शकते. डब्ल्यूपीआयमध्ये धातू, रसायने, प्लास्टिक, रबर यांसारख्या कारखान्यांशी संबंधित वस्तूंना जास्त महत्त्व दिले जाते.
गत महिन्यात मोठी वाढ
दैनंदिन गरजेच्या वस्तू, इंधन आणि विजेचे दर गगनाला भिडले आहेत. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची (प्रायमरी आर्टिकल्स) महागाई ३.७८ टक्क्यांवरून वाढून ४.९९ टक्के झाली. खाद्यपदार्थांची (फूड इंडेक्स) महागाई ३.११ टक्क्यांवरून वाढून ४.४९ टक्क्यांवर पोहोचली आहे. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील घाऊक महागाई दर २४.८९ टक्क्यांवरून वाढून ३०.३३ टक्के झाला आहे. उत्पादित वस्तूंचा घाऊक महागाई दर ६.६८ टक्क्यांवरून वाढून ७.४८ टक्के राहिला.
















