लातूर : प्रतिनिधी
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील संत गोरोबा सोसायटी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर येथे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र क्र. १५ ची सुरुवात करण्यात आली आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आणि ट्वेंटीवन अॅग्री लि. च्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या पुढाकारातून हे प्रशिक्षण केंद्र चालवण्यात येत आहेत.
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या प्रयत्नातून शहरी भागातील महिलांना रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. विलासराव देशमुख फाउंडेशन महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. या नवीन प्रशिक्षण केंद्रामध्ये एकूण ८३ महिलांनी सहभाग नोंदवला आहे. या प्रशिक्षणात महिलांना शिलाईच्या शिवणकामातील विविध पद्धती शिकवल्या जाणार आहेत. संस्थेच्या विभाग प्रमुख संगीता मोळवणे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी प्रभागचे नगरसेवक विकास कांबळे, सोशल मीडिया प्रमुख प्रवीण सूर्यवंशी, ट्रेनर प्रेमा ठाकूर, संस्थेचे समन्वयक गजानन बोयणे, सोशल प्लॅनर सोमनाथ कावळे आणि प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
















