जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा ९ वा दिवस आहे. दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम असून, तोपर्यंत आपण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. अशातच आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी रात्री मनोज जरांगे यांची भेट घेऊन संवाद साधला आहे. तसेच यापुढे देखील सरकार आणि जरागेंमध्ये संवाद घडवण्याची जबाबदारी बच्चू कडू यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असेपर्यंत आमदार बच्चू कडू अंतरवाली सराटी येथेच तळ ठोकून राहणार आहेत.
मनोज जरांगे यांनी दुस-या टप्प्यात सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसेच, अंतरवाली सराटी गावात देखील नेत्यांना येण्यास आंदोलकांकडून मनाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर जरांगे यांनी एक पाऊल मागे घेत आपण एकदा सरकारशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे, आमदार बच्चू कडू यांनी सरकारची बाजू मांडण्यासाठी बुधवारी जरांगे यांची अंतरवालीत जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली. तर, जरांगे यांनी पाणी घेण्याची विनंती यावेळी कडू यांनी केली. मात्र, जरांगे यांनी याला नकार दिला. दरम्यान, यापुढील आंदोलक आणि सरकारमध्ये संवाद घडवून आणण्याचे काम बच्चू कडू यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, आंदोलन सुरू असेपर्यंत आमदार बच्चू कडू अंतरवाली सराटी येथेच तळ ठोकून राहणार आहेत.