राऊ : इंदूर-महू दरम्यान धावणा-या डेमू ट्रेनशी संबंधित एक व्हीडीओ समोर आला आहे. यात ट्रेन थांबलेली आहे तर लोको पायलट ट्रॅकच्या कडेला असलेल्या एका दुकानावर उभा आहे. तो दुकानातून समोसे खरेदी करतो, नंतर इंजिनकडे जातो. लोको पायलट इंजिनमध्ये चढल्यानंतर ट्रेन पुढे निघून जाते.
हा व्हीडीओ राऊ येथील रंगवासा रोड परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की इंदूर-महू डेमू ट्रेन येथे अनेकदा काही मिनिटांसाठी थांबते. लोको पायलट ट्रेनमधून उतरून जवळच्या दुकानातून समोसे खरेदी करतो. यानंतरच ट्रेन येथून पुढे निघते.
चौकशीनंतर कारवाई होणार
रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मुकेश कुमार यांनी सांगितले की, व्हायरल झालेला व्हीडीओ त्यांच्या निदर्शनास आला आहे. तो वरिष्ठ अधिका-यांकडे पाठवण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. हे सिद्ध झाले की लोको पायलटनी अधिकृत कारण, सिग्नल किंवा परिचालन संबंधी गरजेविना ट्रेन थांबवली आणि वैयक्तिक कामासाठी केबिनमधून बाहेर पडला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.
















