लातूर : प्रतिनिधी
कमला नेहरू विद्यालय खोरी गल्ली, लातूर येथे गेल्या १० वर्षांपासून विना वेतन काम करणा-या आशाबी मिर्झा, उत्तरेश्वर चादर, जावेद शेख या शिक्षकांचे वैयक्तिक मान्यता द्यावी या मागणीसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या समोर गेल्या आठ दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाची अद्याप माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिका-यांनी दखल घेतली नाही. आंदोलक ऊन, पाऊस, वारा सहन करत बेमुदत आंदोलन करत आहेत. कमला नेहरू विद्यालय, खोरी गल्ली, लातूर येथे आशाबी खाजामियाँ मिर्झा, उत्तरेश्वर अरूण चादर, जावेद नजीर शेख हे शिक्षक गेल्या १० वर्षापासून नियुक्त असून आम्हाला वैयक्तीक मान्यता मिळावी म्हणून जिल्हा परिषदेच्यासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे.
२०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार इयत्ता ९ वी व १० वी या वर्गासाठी ४ पदे मंजूर असून प्रत्यक्षात केवळ १ शिक्षक कार्यरत आहे, आम्ही तीघेही माध्यमिक विभागातील आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करुन मंजूर रिक्त पदासाठी पात्र आहोत. ३ रिक्त जागेसाठी आम्हाला वैयक्तीक मान्यता द्यावी, अशी मागणी उपोषण कर्त्यांनी केली आहे.
















