मुंबई : दिवाळी जवळ आली असल्याने आठवडाभर आधीच फराळाचे पदार्थ तयार करण्याकडे गृहिणींचा कल आहे. अशातच केंद्र सरकारने आयात शुल्कात मोठी कपात केल्यामुळे सोयाबीन तेलाच्या किमती वधारल्या आहेत. त्यामुळे दिवाळीत फराळासाठी एकीकडे सोयाबीन तेलाची प्रचंड मागणी असताना दुसरीकडे सोयाबीन तेल महागल्याने सणाच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.
सोयाबीन पिकाला यंदा पावसामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने त्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे सोयाबीनपासून तयार होणारी उत्पादने महागली आहेत. अशातच सध्या तेलाची मागणी वाढल्याने सोयाबीनसह पामतेलाची आयात करावी लागत आहे.
पंधरा दिवसांपूर्वी सोयाबीन तेल दर तब्बल सात ते दहा रुपयांनी (प्रतिकिलो) कमी होते. आठ दिवसांपूर्वी १५ किलोच्या डब्यासाठी १,५०० रुपये मोजावे लागत असताना आता तोच डबा १,६५० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे सोयाबीन तेलासाठी प्रतिकिलो १२२ ते १३२ रुपये अधिक मोजावे लागत असल्याने दिवाळी फराळाच्या किमतींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उत्पादन घटल्याचा परिणाम
दिवाळीत तेलाचा विविध पदार्थांसाठी अधिक वापर होतो. खाद्यतेलांमध्ये सोयाबीनशिवाय, शेंगदाणा, सूर्यफूल, राईस ब्रँड आदी विविध कंपन्यांचे तेल बाजारात आहे; मात्र या तेलांचे भाव स्थिरावलेले आहेत. सप्टेंबरअखेरीस सोयाबीनची स्थिती चांगली होती. त्यामुळे या तेलाच्या किमतीही ११५ ते १२२ रुपये किलोवर स्थिर होत्या; मात्र आता उत्पादन घटल्यामुळे ग्राहकांना महागाईचे चटके बसत आहेत.