जळगाव : प्रतिनिधी
जळगावमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनीच स्मार्ट मीटरविरोधात पुढाकार घेतला आहे. महायुतीचा घटक असलेल्या आमदार पाटील यांचा विरोध म्हणजे मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर मानला जातो.
राज्यभरात महावितरण कंपनी स्मार्ट मीटर बसवीत आहे. त्याला वीजग्राहकांचा तीव्र विरोध आहे. या विरोधाला आता राजकीय किनार लाभली आहे. महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू आहे. त्याला ठिकठिकाणी विरोध होत आहे.
त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विरोध खोडून काढला.
आमदार पाटील यांनी स्मार्ट मीटरचा पंचनामाच केला. एका ग्राहकाला ९५ युनिट वापरल्यानंतर चौदाशे रुपये बिल येत होते. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ६५ युनिट वापर झाला. त्याचे बिल २४ हजार रुपये आले. त्यातही १४ हजार रुपये दंडाचा समावेश, असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. त्यामुळे विरोध नाही हे राज्य शासनाचे म्हणणे योग्य नाही. कारण माझ्याकडे अनेक नागरिक सदोष बिले घेऊन येतात. ते लिखित तक्रार करीत नाहीत. या सगळ्यांना महावितरणकडे लिखित तक्रार करण्याचे आमदार पाटील यांनी सुचविले आहे.
कोणत्याही नागरिकाने मागणी केलेली नसताना स्मार्ट मीटर बसविले जाते. त्याविषयी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. त्यामुळे मी स्वत:च राज्य शासनाला स्मार्ट मीटर बसवू नये अशी विनंती करणार असल्याचे म्हणत आमदार पाटील यांनी राज्य शासनाला घरचा आहेर दिला आहे.
















