नवी दिल्ली : कामाख्या वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाली, याला अनेक महिने लोटले. यानंतर पुढील स्लीपर वंदे भारत ट्रेन अद्यापही प्रवाशांच्या सेवेत आलेली नाही. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा एक नवा कोरा रेक तयार आहे, परंतु, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही, अशी माहिती मिळाली आहे. यातच आता १२० वंदे भारत स्लीपर ट्रेनचे काम थांबल्याचे समजते. याबाबत एक महत्त्वाचे कारण समोर आले असून भारतीय रेल्वेकडे काय पर्याय आहेत, यावर चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.
२०२३ मध्ये एकूण २०० वंदे भारत स्लीपर ट्रेन्ससाठी निविदा काढण्यात आल्या होत्या, त्यापैकी ८० ट्रेन्स बनवण्याची जबाबदारी टिटागड रेल सोल्युशन्स आणि बीएचईएल यांच्या संयुक्त उपक्रमाला देण्यात आली. तसेच भारत-रशिया भागीदारी असलेल्या ‘किनेट रेल्वे सोल्युशन्स’ कंपनीद्वारे बांधण्यात येत असलेल्या १२० स्लीपर ट्रेन येण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. ट्रेनचे डिझाइन अद्याप अंतिम झालेले नाही. किनेटला डिझाइन देण्यासाठी एका जर्मन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु त्याने अद्याप मंजूर केलेले अंतिम डिझाइन कंपनीकडे सादर केलेले नाही. कंपनीने म्हटले आहे की या स्लीपर ट्रेनचा पहिला प्रोटोटाइप २०२६ च्या अखेरीस तयार होईल, म्हणजेच हा प्रकल्प नियोजित वेळेपेक्षा दोन वर्षांहून अधिक मागे आहे असे सांगितले जात आहे.
दरम्यान, ट्रेनच्या अभियांत्रिकी आणि डिझाइनच्या या मोठ्या प्रकल्पात शंभरहून अधिक पुरवठादार एकत्र काम करत आहेत. सर्व पुरवठादार ठरलेल्या योजनेनुसार काम करत आहेत आणि वंदे भारत स्लीपर ट्रेनची रचना व जुळणी स्वत: किनेटनेच केली आहे, ज्यामुळे हा प्रकल्प योग्य दिशेने पुढे जात आहे असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच भारतीय रेल्वे आता हे आधुनिक स्लीपर वंदे भारत ट्रेनचे कोच वेगाने तयार करण्यासाठी स्वत:च्या कारखान्यांचा वापर करत आहे अशी माहिती एका अधिका-यांनी दिली आहे.
















