सोलापूर : शहरात रविवारी पहाटे घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण सोलापूर हादरून गेले आहे. विजापूर रोड परिसरातील टिकेकर वाडी रेल्वे मार्गावर एका ३३ वर्षीय महिलेने आपल्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह धावत्या रेल्वेखाली उडी मारून जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेमुळे शहरासह सुशीलनगर आणि सैफूल परिसरात तीव्र शोककळा पसरली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या केलेल्या आईचे नाव वर्षा पांडुरंग आधटराव (वय ३३ वर्षे) आणि मुलीचे नाव स्वरा पांडुरंग आधटराव (वय १४ वर्षे) असे आहे. या दोघी मूळच्या सोलापूर येथील सुशीलनगर आणि सैफूल परिसरातील रहिवासी होत्या.
पोलीस तपासातून आणि नातेवाईकांच्या माहितीवरून समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पती पांडुरंग आधटराव आणि पत्नी वर्षा यांच्यात कौटुंबिक कारणावरून जोरदार भांडण झाले होते. वाद विकोपाला गेल्यानंतर मध्यरात्री सुमारे १२ च्या सुमारास पतीने पत्नी वर्षा आणि मोठी मुलगी स्वरा या दोघींना सुशीलनगर येथील वर्षाच्या मावशीच्या घरी आणून सोडले आणि तो स्वतःच्या घरी निघून गेला. मावशीच्या घरी सोडल्यानंतर काही वेळातच, म्हणजे मध्यरात्री १२:३० ते १ च्या सुमारास, वर्षा आपल्या मुलीला घेऊन शांतपणे घराबाहेर पडल्या. आसरा ब्रिजवरून पुढे चालत जात दोघी होटगी रोड-विजापूर रोड परिसरातील आयकर भवनामागील टिकेकर वाडी रेल्वे रुळावर पोहोचल्या. पहाटेच्या सुमारास धावत्या रेल्वेसमोर स्वतःला झोकून देत किंवा रुळावर बसून त्यांनी जीवन संपवले. रेल्वेच्या भीषण धडकेत दोघींचाही जागीच मृत्यू झाला.
रविवारी पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास रेल्वे कर्मचार्यांना रुळावर दोन मृतदेह पडल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाणे आणि रेल्वे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) पाठवून दिले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
वर्षाच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये यापूर्वीही वाद होत होते. वर्षाने काही महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तालयातील महिला सुरक्षा कक्षात (भरोसा सेल) तक्रार दाखल केली होती, जिथे समुपदेशन करून वाद मिटवण्यात आला होता; मात्र तरीही वाद सुरूच राहिला. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. सध्या विजापूर नाका पोलीस दोघींचे मोबाईल कॉल रेकॉर्ड, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवून आत्महत्येमागचे नेमके कारण शोधत आहेत.
















