भारताच्या खात्यात आणखी २ सुवर्णपदकाची भर
ग्लासगो : वृत्तसंस्था
राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ च्या अंतिम टप्प्यात भारताच्या खात्यात आणखी २ सुवर्णपदकांची भर पडली. विशेष म्हणजे भारताने प्रथमच ज्युदो क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल पटकावले. भारताच्या अस्मिता डेने ४८ किलो वजन गटात तर हर्ष सिंहने ६० किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली.
भारताच्या अस्मिता डेने ४८ किलो वजनी गटात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात तिने कॅनडाच्या हेडी क्वॉकला पराभवाची धूळ चारली तर हर्ष सिंहने ६० किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ कॅट्जला पराभूत करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. या सामन्यात त्याने १०-१ ने विजय मिळवला. भारताला दोन्ही सुवर्ण पदके २० मिनिटांच्या अंतराने मिळाली.
ज्युदो स्पर्धेत हर्षने फायनल गाठण्यापूर्वी सुरुवातीपासूनच स्पर्धेत आपले निर्विवाद वर्चस्व राखले. फायनलमध्ये हर्षचा सामना ऑस्ट्रेलियाच्या ऑलिम्पियन ज्युदोपटू जोशुआ काट्झ याच्याशी झाला. हर्षने हा सामना १०-० अशा फरकाने जिंकून भारताच्या झोळीत सुवर्णपदक टाकले. दुसरीकडे अस्मिता डेने अंतिम सामन्यात कॅनडाच्या हेडी क्वाकशी लढत दिली. अटीतटीच्या लढतीत सामना ‘गोल्डन स्कोअर’मध्ये गेला, जिथे अस्मिताने कॅनडाच्या खेळाडूला २-१ ने पराभूत करत भारतासाठी ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले आणि भारताला आज दुहेरी लाभ झाला.
भारताच्या खात्यात
६ गोल्ड, १० रौप्य
भारताने कॉमनवेल्थ स्पर्धेत आतापर्यंत ६ गोल्ड जिंकले, १० रौप्य आणि १४ कांस्य पदक नावावर केले. भारताची मेडल संख्या १९ झाली असून दहाव्या क्रमांकावरून आठव्या स्थानी झेप घेतली आहे.
यामिनीने जिंकले रौप्य पदक
ज्युदो स्पर्धेत भारताने आज २ सुवर्ण पदकांची कमाई केली. तिसरे गोल्डदेखील मिळण्याची शक्यता होती. कारण भारताच्या यामिनी मौर्यने चांगली लढत दिली होती. परंतु यामिनीचा इंग्लंडच्या एसिल्या टोपराकविरोधात थोडक्यात विजय हुकला. त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
















