लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील वाढती वाहतूक, नागरिकांना भेडसावणारी वाहतूक कोंडी तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे निर्माण होणा-या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी परिवहन समिती, लातूर महानगरपालिका आणि लातूर शहर पोलीस यांची संयुक्त बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीत लातूर शहरातील बंद असलेले सिग्नल सुरू करणे व गोलाई परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिरगे, परिवहन समितीचे सदस्य तसेच लातूर महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. शहरातील प्रमुख चौकांमधील बंद पडलेले वाहतूक सिग्नल, वाढती वाहतूक कोंडी, गोलाई परिसरातील अतिक्रमण आणि त्यावर प्रभावी उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीमध्ये शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतूक सिग्नल बंद असल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघाताची शक्यता वाढत असल्याची बाब निदर्शनास आली. तसेच गोलाईसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, हातगाडीधारक तसेच इतर लहान-मोठ्या विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा वेग मंदावत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व बंद वाहतूक सिग्नल तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत आवश्यक कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गोलाई परिसरासह शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस प्रशासन व महानगरपालिका यांच्या संयुक्त पथकांमार्फत विशेष मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आले.
















