जळकोट : प्रतिनिधी
विशेष संक्षीप्त पुनरीक्षण अभियानांतर्गत मतदार यादीच्या डिजिटायझेशनचे काम लातूर जिल्ह्यात सर्वप्रथम शंभर टक्के पूर्ण करण्याचा मान जळकोट तालुक्याने मिळवला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक नोंदणी अधिकारी सुशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण जळकोट निवडणूक यंत्रणेचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
या यशाबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त, विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनी जळकोट टीमचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे. उत्कृष्ट नियोजन, प्रभावी समन्वय, वेळेचे काटेकोर नियोजन आणि अधिकारी-कर्मचा-यांच्या अथक परिश्रमामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या मोहिमेत तहसीलदार राजेश लांडगे, सर्व सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक, बूथ लेव्हल अधिकारी तसेच त्यांच्या सहाय्यकांनी मोलाची भूमिका बजावली. सर्वांनी संघभावनेने आणि जबाबदारीने काम करीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून जळकोट तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
एसआयआर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणून तहसीलदार राजेश लांडगे, गटविकास अधिकारी ऐश्वर्या चितारी, नायब तहसीलदार रंगनाथ कराड, सहाय्यक गटविकास अधिकारी रोहित देडगे, मुख्याधिकारी रोहित आरबोळे, मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील आणि गटशिक्षणाधिकारी रश्मिता साहू यांनी वेळोवेळी आढावा घेतला.
तसेच बीएलओ पर्यवेक्षक एस. बी. तिडके, सचिन काडवादे, एम. एस. पाटील, एम. व्ही. हंगरगे, के. पी. बिरादार, बालाजी काटे आणि व्यंकट आंदे , सुधाकर बुक्के यांनी बीएलओंच्या कामकाजावर सातत्याने लक्ष ठेवले. तसेच तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिका-यांनीही मोलाची भूमिका बजावली. तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे अलीम शेख, शेख आर. पी. तसेच इतर कर्मचा-यांनीही बीएलओंच्या अडचणी तातडीने सोडवत संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडली. या यशाबद्दल सर्व अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक आणि सहाय्यकांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
















