पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
सायबर फसवणुकीसाठी म्युल अकाउंट पुरवणा-या रॅकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीने देशभरातील तब्बल ६५ नागरिकांची १५० कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी एकाला अटक केली असून टोळीतील इतरांचा शोध सुरु आहे.
फसवणूक करण्यासाठी म्युल अकाउंट अर्थात बँक खाती उपलब्ध करून देणारी ही टोळी आहे. या टोळीतील सचिन संजय काळे या २५ वर्षीय ठगाला अटक करण्यात आली. त्याच्या नावावर विविध बँकांमध्ये ९ खाती उघडण्यात आली आहेत, ज्यामधून सायबर फसवणुकीची रक्कम फिरवली जात होती. एनसीआरपी पोर्टलवरील माहितीनुसार या रॅकेटद्वारे देशातील ६५ नागरिकांची तब्बल १५० कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
यापैकी आरोपीच्या विविध खात्यांमध्ये १ कोटी १५ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचेही समोर आले. आता आळंदी पोलिसांकडून या टोळीतील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्यांचा आणि रकमेचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या सांताक्रुज मध्येही धक्कादायक घटना घडली. पश्चिम उपनगरात घर देण्याच्या बहाण्याने क्राइम पेट्रोल फेम सतीश नायकोडे यांची जवळपास २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. मागील वर्षभरापासून न्यायासाठी सतीश नायकोडे पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत. स्वत:सह कुटुंबावर ओढवलेली आपबीती सांगताना नायकोडे यांना अश्रू अनावर झाले. यादरम्यान त्यांना आपल्या वडिलांनाही गमवावे लागले तर आत्महत्येचा देखील त्यांनी प्रयत्न केला.
सांताक्रुज येथे एसआरए प्रकल्पात घर मिळवून देण्याच्या अमिषापोटी नायकोडे आस्था प्रॉपर्टीजच्या संपर्कात आले आणि यातून जवळपास त्यांच्याकडून २५ लाख रुपये उकळण्यात आले. अधिका-यांच्या सह्या, शिक्के, स्टॅम्प पेपर वर लेखी स्वरूपात या सर्व बाबी झाल्याने सतीश नायकोडे यांचा विश्वास अधिक घट्ट झाला. मात्र यातून त्यांना सध्या केवळ मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एआय तंत्रज्ञानाआधारे
१.७ कोटीला गंडा
पुणे शहरात एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून झालेली एक मोठी फसवणूक उघडकीस आली. सोशल मीडियावर अर्थमंत्र्यांच्या खोट्या व्हीडिओमधील लिंकवर क्लिक करणे एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. स्पेसएक्स शेअर्सच्या नावाखाली सायबर चोरांनी वेगवेगळ््या बँक खात्यांद्वारे पुणेकराकडून १.०७ कोटी रुपये उकळले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन फॉरेक्स ट्रेडिंग आणि इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत असल्याचा एक खोटा व्हिडिओ पाहून व्यावसायिक जाळ््यात अडकले.
















