राम मंदिरातील दानचोरीवरून विरोधक आक्रमक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या १२ व्या दिवशी राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीला गेल्याच्या मुद्यावरून दोन्ही सभागृहांमध्ये मोठा गदारोळ झाला. मंगळवारी लोकसभेचे कामकाज केवळ १९ मिनिटे चालले. या काळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर सुधारणांशी संबंधित विधेयके मांडली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
राज्यसभेचे कामकाज दिवसभरात दोनदा तहकूब करण्यात आले. सकाळी ११ वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच ते तहकूब करावे लागले. दुपारी १२ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले. परंतु ते केवळ २० मिनिटे चालले. त्यानंतर दुपारी २ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले. तत्पूर्वी, राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यात खडाजंगी झाली. खर्गे यांनी सांगितले की, राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना केंद्र सरकारने केली होती आणि सरकारनेच या ट्रस्टला ७० एकरांहून अधिक जमीन हस्तांतरित केली होती. त्यांनी नमूद केले की, राम मंदिराशी संबंधित प्रत्येक कार्यक्रमात खुद्द पंतप्रधान सहभागी झाले होते. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, आता ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणा कुठे आहेत, सरकारने यावर सभागृहात उत्तर दिले पाहिजे, असा आग्रह धरला.
याला उत्तर देताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने काळ््या पट्टया बांधून राम मंदिराच्या बांधकामाला विरोध केला होता. ते म्हणाले की, जे लोक पूर्वी विरोधात होते, तेच लोक आज मगरीचे अश्रू ढाळून देशाला दिशाभूल करू शकत नाहीत. सरकारकडे उत्तरे मागण्यापूर्वी त्यांनी प्रभू रामाचा अपमान केल्याबद्दल आधी देशाची माफी मागावी.
दान चोरी प्रकरणाचा
विरोधकांकडून निषेध
राम मंदिरातून दान-अर्पण चोरीला गेल्याच्या मुद्यावरून काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल यांसारख्या विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारचा निषेध केला. राम मंदिरासाठीच्या अर्पणाची चोरी झाल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी पक्षाच्या इतर खासदारांसह संसद परिसरात दानपेटी घेऊन आंदोलन केले.
गोंधळातच विधेयक मांडले
लोकसभेचे कामकाज सुरू होताच दुपारी २ वाजता विरोधी पक्षाचे खासदार जागेवरून उठले आणि घोषणाबाजी करू लागले. पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनी खासदारांना घोषणाबाजी न करता आपापल्या जागांवर बसण्याची विनंती केली. या गोंधळातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर आणि इतर कायदे (सुधारणा) विधेयक सादर केले.
चंदा चोरीवर उत्तर द्या
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट विरोधात रोख रक्कम, देणग्या, दागिने आणि जमीन यांबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. सरकारने सभागृहात उत्तर दिले पाहिजे.
















