छत्रपती संभाजीनगर : सध्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) दबावगट म्हणून काम करणार असून सध्याच्या घडीला भारताला अशाच एका प्रभावी दबावगटाची गरज आहे असे सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी बुधवारी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथे सीजेपीच्या मुख्य कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना दिपके म्हणाले की, या बैठकीत माध्यमे आणि न्यायव्यवस्था यांसारख्या संस्थांवरील जनतेचा ढासळत चाललेला विश्वास हा प्रमुख चर्चेचा विषय असेल. याशिवाय इथेनॉल मिश्रित इंधन आणि वाढती बेरोजगारी या मुद्यांवरही बैठकीत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सध्या तरी सीजेपी दबावगट म्हणूनच काम करेल, कारण सध्याच्या काळात देशाला अशा दबावगटाचीच गरज आहे असे दिपके यांनी सांगितले. सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितले की, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे पुढेही पक्षाचे मार्गदर्शक राहतील आणि पक्ष त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेणार आहे.
अलीकडेच नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आणि इतर परीक्षा गैरव्यवहारांविरोधात सीजेपीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांविरोधात दाखल करण्यात आलेले एफआयआर मागे घेण्यासाठी सीजेपी प्रयत्न करणार असल्याचे दास यांनी सांगितले. या मुद्यावर आम्ही सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहोत असे ते म्हणाले. देशभरातील अलीकडील विद्यार्थी आंदोलनांमध्ये जखमी झालेल्या आंदोलनकर्त्यांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठीही आम्ही काम करत आहोत असेही दास यांनी सांगितले.
आंदोलन देशभरात
सीजेपीचे आंदोलन देशातील विविध शहरांमध्ये पसरले. मात्र, काही ठिकाणी आंदोलने हिंसक झाली. त्यानंतर दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बिहारमध्ये पोलिसांनी विद्यार्थी आंदोलनकर्त्यांवर कारवाई करत त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले.
















