तेहरान : होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदीवरून अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी व राजनैतिक तणाव अधिकच ताणला गेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शेवटची संधी देत, होर्मुझची सामुद्रधुनी लवकरात लवकर खुली न केल्यास दुस-या महायुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या आणि तीव्र लष्करी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा दिला आहे.
मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, आम्ही इराणशी चर्चा करत असून त्यांना ही एक शेवटची संधी देत आहोत. ते लवकरच यावर कोणताही एक निर्णय घेतील. ही काही फार गुंतागुंतीची बाब नाही. आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबत चर्चा करत आहोत. मात्र, अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. तेहरानमधील एका पत्रकार परिषदेत इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई म्हणाले आम्ही सध्या अमेरिकेशी कोणतीही वाटाघाटी करत नाही आहोत. यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराणचे नेतृत्व अत्यंत दुतोंडी आहे. आधी ते भेटीसाठी विनवणी करतात आणि नंतर उघडपणे सांगतात की कोणतीही चर्चा होत नाहीये. ट्रम्प पुढे म्हणाले की संभाव्य हल्ल्याच्या वृत्तामुळे इराण अस्वस्थ झाला आहे. हा हल्ला दुस-या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा आणि तीव्र हल्ला असेल. आपल्याला होर्मुझची सामुद्रधुनीबाबत चर्चा करायची आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेशी चर्चा फेटाळली असली तरी, सागरी सुरक्षेसाठी इराण आणि ओमान यांच्यात थेट वाटाघाटी सुरू आहेत. या चर्चेत कोणत्याही तिस-या देशाचा सहभाग नाही. अहवालानुसार, प्रस्तावित करारात अनेक महत्त्वाच्या मुद्यांचा समावेश असू शकतो.
पर्शियन आखाताच्या प्रवेशद्वारावर असलेली होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. फेब्रुवारीमध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी, जगातील सुमारे २० टक्के तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक याच मार्गाने होत होती. इराणच्या हल्ल्यांमुळे हा मार्ग सध्या बंद असून, इराण-ओमान करार यशस्वी झाल्यास चालू युद्ध संपण्याचा मार्गही मोकळा होऊ शकतो.
















