नांदेड : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या देगलूर आगारात नुकतीच दाखल झालेली नवीकोरी ईव्ही वातानुकूलित (एसी) एसटी बस अचानक रस्त्यातच बंद पडली. बसमध्ये प्रवासी असतानाच हा प्रकार घडल्याने काही काळ प्रवाशांची गैरसोय झाली. अखेर ट्रॅक्टरच्या सहाय्याने बसला टोचन देत आगारात ओढत आणावे लागले.या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ उपस्थित नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून तो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नवीन बसची अशी अवस्था असेल तर प्रवाशांनी विश्वास ठेवायचा कसा? असा सवाल अनेकांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देगलूर आगाराच्या ताफ्यात काही दिवसांपूर्वीच ही वातानुकूलित बस दाखल झाली होती. प्रवाशांना आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या बसची सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, नियमित फेरीदरम्यान अचानक आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे बस रस्त्यातच बंद पडली. बराच वेळ प्रयत्न करूनही बस सुरू न झाल्याने अखेर ट्रॅक्टर बोलावून बसला टोचन देण्यात आले. हा प्रकार पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.घटनेनंतर काही प्रवाशांना पयार्यी बसची व्यवस्था करून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती मिळाली. दरम्यान, बसमध्ये नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला, याची तपासणी करण्यासाठी संबंधित तांत्रिक विभागाकडून पाहणी करण्यात येणार असल्याचे समजते.
















