लातूर : प्रतिनिधी
न्याय, संविधान आणि पर्यावरण या अत्यंत महत्त्वाच्या समकालीन विषयांवर नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने लातूरमध्ये एका विशेष जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद विधि महाविद्यालय आणि लातूर जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने न्याय संवाद : कायदा, पर्यावरण आणि नागरिक या विषयावर शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता बार्शी रोडवरील दयानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती न्या. अभय श्रीनिवास ओक उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती न्या. मंगेश पाटील आणि पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी असतील.
न्यायव्यवस्था, पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांचे घटनात्मक कर्तव्य या विषयांवर थेट संवाद साधण्याची ही दुर्मिळ संधी असल्याने वकील, विधी विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक तसेच सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाच्या प्राचार्य डॉ. पूनम नाथानी व लातूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शिवकुमार जाधव यांनी केले आहे.
















