शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
निलंगा-नळेगाव-घरणी या मुख्य रस्त्यापासून जोगाळा गावाकडे जाणारा एकमेव संपर्क रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे, त्यात साचलेले पावसाचे पाणी आणि दोन्ही बाजूंनी वाढलेल्या काटेरी व इतर झाडांमुळे हा रस्ता अपघातास निमंत्रण देत आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारक व नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जोगाळा गावातील नागरिकांना तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क साधण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. याच मार्गावरून विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थ दररोज प्रवास करतात मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झाडांनी अक्षरश: अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. समोरासमोर दोन वाहने आल्यास एकमेकांना बाजू देणेही कठीण होत असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांसह अन्य वाहनधारकांना मोठी कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित विभागाचे लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गावातील लोकांना ये-जा करण्यासाठी हा मुख्य रस्ता खराब झाल्याने ग्रामस्थ प्रवाशी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ये-जा करणा-या ग्रामस्थांना दररोज या रस्त्यावरून जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.यामुळे जोगाळा रस्त्यालगतची काटेरी झाडे तातडीने हटवून रस्ता रुंद करावा, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी सरपंच सौ. निर्मला पंडीतराव माने, उपसरपंच इंद्रजित माने यांच्यासह ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे केली आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
















