भारताच्या आयात धोरणात बदल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षामुळे मध्य पूर्वेत युद्धाचे ढग गडद झाले आहेत. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमधून होणा-या जागतिक व्यापाराला अडथळे निर्माण होत आहेत. या तणावाचा फटका भारतासह जगातील अनेक देशांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने एलपीजी आयातीच्या धोरणात मोठे बदल केले आहेत. भारत बहुतांश एलपीजी आयातीसाठी आधी मध्य-पूर्व देशांवर अवलंबून होता. परंतु आता भारताने अमेरिकेकडून एलपीजी आयात वाढविली आहे. भारताला ६७ टक्के एलपीजी पुरवठा अमेरिकेकडून होत असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली.
अमेरिका आता भारताचा सर्वांत मोठा एलपीजी पुरवठादार देश बनला आहे. भारताने सुरुवातीला एलपीजीच्या एकूण गरजांपैकी थोडा हिस्सा अमेरिकेकडून मिळविण्याचे नियोजन केले होते. मात्र, ते प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. या वर्षीच्या सुरुवातीला एकूण एलपीजीच्या १० टक्के आयात अमेरिकेकडून करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यात वाढ करण्यात आली असून, आता एकूण एलपीजीच्या आयातीपैकी सुमारे ६७ टक्के वाटा अमेरिकेचा आहे, असे हरदीपसिंह पुरी म्हणाले.
















