मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील कृषी संकटावर संताप व्यक्त करत पटोले म्हणाले, सध्या शेतीचा हंगाम सुरू असताना राज्यभरात खतांचा आणि बियाणांचा प्रचंड तुटवडा आहे. बाजारात बोगस बियाणे आणि बनावट खते सर्रास विकली जात असून शेतक-यांना लुटले जात असल्याची टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे.
सध्याच्या राजकीय घडमोडींवर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सध्या शेतक-यांवर अस्मानी व सुलतानी सकंट आलेले आहे व सरकारचा भ्रष्ट कारभार सुरू आहे.
तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा त्रास होत आहे आणि याच त्रासाची तक्रार करण्यासाठी शिंदे हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते, असा खळबळजनक दावा पटोले यांनी केला आहे.
पुढे बोलताना पटोले म्हणाले, अकोल्यातील घटनेवरून स्पष्ट झाले आहे की, सरकारच या बोगस कंपन्यांना पाठीशी घालत आहे. इतकेच काय तर शासकीय ‘महाबीज’ महामंडळसुद्धा बोगस बियाणे विकत असल्याचे उघड झाले आहे. या भ्रष्ट कारभारामुळे आज देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आणि प्रशांत किशोर यांच्या भूमिकेवर ते म्हणाले, प्रशांत किशोर पक्षांचे प्रमोशन करण्याचे टेंडर घेतात. राष्ट्रवादीतील तो त्यांचा अंतर्गत वाद असून काँग्रेसला त्यात पडण्याचे कारण नाही. मराठा आणि ओबीसी आरक्षणावर बोलताना पटोले म्हणाले, २०१४ पासून भाजप, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी मराठा, ओबीसी, धनगर, बंजारा आणि गोवारी समाजाला आरक्षणाची खोटी आश्वासने दिली. केवळ जातीजातीत तेढ निर्माण करून मतांचे राजकारण केले जात आहे.
केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने जनतेला वा-यावर सोडून सत्ताधारी मजा मारत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, महागाई, बेरोजगारीने लोकांना जगणे कठीण झाले आहे. सरकारकडून बियाणे आणि खतांचा काळा बाजार करून शेतक-यांची लूट सुरू आहे. अनेक परीक्षांचे पेपर फोडून विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करत असल्याची टीकाही या प्रसंगी नाना पटोले यांनी केली.
















