नवी दिल्ली : अमित शहा सभागृहात येणार ही अफवा आहे असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीतील निवासस्थानी या विषयावर अधिक बोलताना ते म्हणाले, अमित शाह यांनी येण्याचे मन बनवले आहे तर ते काय देशावर, लोकशाहीवर, संसदेवर मेहरबानी करताहेत का? येऊ देत संसदेत बघुया. उपकार करताहेत का ते संसदेत येऊन असे म्हणत संजय राऊत यांनी शरसंधान साधले.
यासंदर्भात अधिक बोलताना राऊत म्हणाले, तुम्हाला संसदेत यावंच लागणार. ही देशाची ताकद आहे. ज्या पद्धतीने तुम्ही जंतरमंतरवरील आंदोलकांवर पेलेट गन चालवली, अश्रूधुर सोडला असे खूप अत्याचार केले आहेत. त्यामुळे तुम्हाला उत्तर देणे हे भाग आहे. तुम्ही तर राजीनामा द्यायला हवा, याजागी दुसरा कॉंग्रेसचा मंत्री असता तर, तुम्ही लोकांनी राजीनामा घेतला असता. यासंदर्भात अधिक भाष्य करताना राऊत म्हणाले, शिवराज पाटील यांनी कपडे बदलून बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला होता आणि तुम्ही जेन झी आंदोलकांवर इतका अत्याचार केलाय की, विचारता सोय नाही. मग तुम्ही का त्या जागेवर अजून बसलेले आहात. तुम्ही देव आहात का? असा प्रश्न यावेळी राऊतांनी उपस्थित केला.
राज्यात नवीन उद्योगधंदे येत आहेत या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले, राज्यामध्ये सध्याच्या घडीला साडेतीन हजार कंपन्या बंद का झाल्या आहेत त्याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे. कुठे आहे रोजगार? असा प्रश्न विचारत राऊतांनी राज्य सरकारला धारेवर धरले. यावर अधिक बोलताना ते म्हणाले सरकारच्या धोरणांना, खंडणीखोरीला कंटाळून राज्यामध्ये अनेक उद्योग बंद झाले आहेत. एमआयडीसीची अवस्था बघा. माझ्याकडे प्रत्येकाचा सर्व हिशोब आहे. माझ्या इतका हिशोब सरकारच्या ऑडिरटर जनरलकडे नाही असे म्हणत राऊतांनी राज्यातील सरकारी धोरणांवर टीका केली. राऊत म्हणाले, सरकारमध्ये कसे सर्व फावडे घेऊन बसले आहेत. सरकारी तिजोरी खो-याने लुटताहेत, जमिनी कशा विकल्या जाताहेत. शाळेपासून ते आरोग्य खात्यापासून आदिवासी खात्यापर्यंत सर्वत्र लाचखोरी सुरू आहे. कुठे जातोय निधी काय करताहेत देवेंद्र फडणवीस? असा प्रश्न यावेळी संजय राऊत यांनी विचारला आणि सरकारवर टीकास्त्र सोडले.
















