अयोध्या : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी नियुक्ती करण्यासाठी उच्चस्तरीय समिती मंगळवारी १८ उमेदवारांच्या मुलाखती घेत आहे.
राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहाराचे प्रकरण समोर आल्यानंतर ट्रस्टने पूर्णवेळ सीईओ नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. ट्रस्टच्या एका वरिष्ठ पदाधिका-यांच्या माहितीनुसार, ५,२०० अर्जदारांमधून निवडलेल्या सर्व १८ उमेदवारांचे सोमवारी उशिरा रात्री अयोध्येत आगमन झाले आणि ट्रस्टने सुचवलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी ते मुक्कामी होते. मुलाखती अयोध्येतील राम मंदिराच्या यात्रेकरू सुविधा केंद्रातील परिषद कक्षात घेतल्या जात आहेत. मंगळवारी मुलाखती पूर्ण न झाल्यास ही प्रक्रिया बुधवारीही सुरू राहू शकते, असे ट्रस्टमधील सूत्रांनी सांगितले.
उमेदवार सकाळी सुमारे ९ वाजता राम मंदिर परिसरात पोहोचले आणि मुलाखत प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू झाली, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक उमेदवाराने अयोध्या विमानतळावर पोहोचण्याचे वेळापत्रक आधीच पाठवले होते. ट्रस्टने नियुक्त केलेल्या व्यक्तींनी त्यांना विमानतळावरून आणले. तेथून त्यांना स्वतंत्र वाहनांमधून वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले असे सूत्रांनी सांगितले. उमेदवारांना माध्यमांशी बोलू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. मुलाखत पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा अयोध्या विमानतळावर नेले जाईल, तेथून ते नवी दिल्लीसाठी विमानाने रवाना होतील.
दिल्लीहून ते आपल्या-आपल्या गंतव्यस्थानी जाणारी विमाने पकडतील असेही त्यांनी सांगितले. या १८ उमेदवारांमध्ये माजी अधिकारी तसेच दक्षिणेतील मंदिरांमधील वरिष्ठ पदांवर काम केलेल्या माजी अधिका-यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. तीन सदस्यीय निवड समिती छाननीसाठी सोमवारी रात्री अयोध्येत दाखल झाली. १८ अर्जदारांमधून ती अंतिम निवडीसाठी ट्रस्टसमोर तीन नावे ठेवणार आहे. या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विष्णुकांत चतुर्वेदी आणि सुरेश हावरे यांचा समावेश आहे.
















