लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीयस्तरावर व्हीडीएफ स्कूल ऑफ फार्मसीला भारतीय गुणवत्ता परिषदकडून राष्ट्रीय मूल्यांकन प्रक्रियेत ग्रेड ‘अ’ मानांकन मिळाल्याबद्दल राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मंगळवार दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी जनसंपर्क कार्यालय येथे विलासराव देशमुख फाउंडेशन परिवाराचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी, अशी उल्लेखनीय कामगिरी करीत व्हीडीएफ स्कूल ऑफ फार्मसी लातूर या संस्थेने राष्ट्रीयस्तरावर गुणवत्ता आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. संस्थेला भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या राष्ट्रीय मूल्यांकन प्रक्रियेत देशात ३१ वा क्रमांक प्राप्त झाला असून ‘अ’ म्हणजेच भारतीय गुणवत्ता परिषद अंतर्गत कार्यरत नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग यांच्याकडून प्रतिष्ठेचे ‘अ’ वर्ग मानांकन बहाल करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे हे मानांकन प्राप्त करणारी लातूरची व्हीडीएफ स्कूल ऑफ फार्मसी मराठवाडा विभागातील ही पहिली फार्मसी संस्था ठरली आहे. यावेळी माजी आमदार विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथ शिंदे, लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे, लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, व्हिडीएफ संस्थाचे विश्वस्थ समद पटेल, विजय देशमुख, ऋषिकेश पाटील, व्हीडीएफ स्कूल ऑफ फार्मसीचे प्राचार्य बी. एस. वाकुरे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य राजकुमार साखरे, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.















