नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी या तीन प्रमुख तालुक्यांमध्ये आज दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसर तसेच पेठ तालुक्यातील गोंदे, भायगाव, जांभूळमाळ आणि हरणगाव भागामध्ये दुपारी १२:४० मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर लगेचच, अवघ्या ५ मिनिटांनी म्हणजेच दुपारी १२:४५ मिनिटांनी दिंडोरी तालुक्यातील ननाशी आणि बागडीचा पाडा परिसरात जमिनीला हादरे बसले.
अचानक बसलेल्या या धक्क्यांमुळे नागरिक घराबाहेर पडले. नाशिकच्या या ग्रामीण आणि आदिवासी भागात सातत्याने भूकंपाचे हादरे बसत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र घबराट पसरली आहे. वारंवार होणा-या या भूकंपांमुळे प्रशासनाने तत्काळ याची दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
मागील काही दिवसांत नाशिकमध्ये सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहे. मागील महिनाभरात नाशिकमध्ये ४ ते ५ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. वारंवार बसणा-या भूकंपाच्या धक्क्यामुळे नाशिककरांमध्ये भितीचे वातावरण आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
















