मुंबई : प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे त्यांची सरकारवर, विशेषत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र नाराजी असल्याचे दिसून येत आहे. तुम्ही मला दिलेले आश्वासन पाळले नाही, असा थेट आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.
शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की, महायुतीमध्ये अजिबात एकवाक्यता नाही हे चित्र सातत्याने स्पष्ट होत आहे. नुकताच असा एक निर्णय घेण्यात आला की, मुख्यमंत्री इतर मंर्त्यांचे निर्णय बदलू शकतात. यातून ‘मुख्यमंत्री हेच बॉस आहेत’ हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. महायुतीत अंतर्गत विषयांवर मोठी नाराजी आहे. एकनाथ शिंदेंना आपणच मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. याच वैचारिक मतभेदांमुळे आणि नाराजीमुळे महायुतीला बैठका घ्याव्या लागत आहेत.
दोषी अधिका-यांवर कारवाई करावी
अमरावती येथील रुग्णालयातील दुर्घटनेबाबत बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, या घटनेत जे अधिकारी दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. केवळ रुग्णालयाला जबाबदार धरून चालणार नाही. सरकारने सुरक्षेच्या मोठ्या घोषणा केलेल्या असताना अमरावतीत ही दुर्दैवी घटना घडतेच कशी? यावरून सरकारचे दावे केवळ कागदावरच असल्याचे सिद्ध होते.
बेरोजगार ‘एल्गार तिरंगा रॅली’ काढणार
शशिकांत शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रात उत्तम काम सुरू असल्याचा दावा सरकार करत आहे, मात्र प्रत्यक्षात तरुणांच्या हाताला रोजगार नाही. त्यांच्या बुद्धिमत्तेचा ‘पॅकेज’च्या नावाखाली गैरवापर केला जात आहे. कामगार कायद्यांमधील बदलांमुळे कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविरोधात येत्या २७ तारखेला आम्ही विभागवार आंदोलने करून जिल्हाधिका-यांना निवेदन देणार आहोत, तसेच ‘बेरोजगार एल्गार तिरंगा रॅली’ काढणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली.
स्मार्ट मीटरला आमचा विरोध
शशिकांत शिंदे म्हणाले की, स्मार्ट मीटरबाबत मुख्यमंर्त्यांशी झालेल्या चर्चेत त्यांनी कोणावरही सक्ती करणार नाही असे स्पष्ट केले होते. परंतु, आता प्रत्येकाला स्मार्ट मीटर बसवण्याचे टार्गेट दिले जात आहे. स्मार्ट मीटरमुळे बिल प्रचंड येते, हा जनतेचा संशय दूर करण्यासाठी सरकारने बैठका घ्याव्यात अशी मागणी आम्ही केली होती. या मीटरला आमचा तीव्र विरोध आहे.
















